आपण सर्वच थोडेसे घाबरलेले, काहीसे उदास आणि खूप चिडलेले आहोत. काहीतरी करायला पाहिजे या उर्मीतुन आपल्या मनात बरेच काही विचार येत असतील. कालच्या दोन दिवसात मी ब-याच लोकांशी बोलले, यातील कोणीही, मोठी व्यक्ती वा पुढारी नव्हती हे आधीच स्पष्ट करते. 'तुमच्या-माझ्यासारखा सामान्य माणुस, जो दहशतवादाचा पहिला बळी ठरतो, त्याच्या सुरक्षेची योजना काय?' या प्रश्नाचं उत्तर मला हवं होतं, त्याच सामान्य माणसाकडून.. कारण तो रोज कामाला जाणार असतो. सर्वांकडुन मला ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याचा आशय असा होता -

संकटाच्या वेळी, मग ते बॉम्बहल्ले, दहशतवादी हल्ला असो वा नैसर्गिक आपत्ती; सामान्य माणुसच जातीभेद, धर्मभेद विसरून एकमेकांना मदत करत आला आहे, करत राहील. दहशतवाद हा जगातील प्रत्येक देशाला झालेला रोग आहे. प्रतिहल्ल्याच्या ईंजेक्शनने आराम मिळतो पण तो रोग पूर्ण बरा करत नाही . बीज आतच कुठेतरी दबा धरून बसलेलं असतं. खबरदारीचं औषध वेळेवर घेतलं गेलं नाही, तर रोगप्रतिकारक शक्ति कमी होते आणि रोग बळावतो. दहशतवाद आपल्याच काय, पण कोणत्याही देशातून समूळ नष्ट करणं फारच कठीण आहे. म्हणजे, उपाय एकच – ‘या खबरदारीच्या औषधाचा डोस रोज पोटात गेला पाहिजे.'

बाहेरून सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा, लष्कर, गुप्तहेर खाती आहेतच पण या देशाचा नागरिक म्हणून, अंतर्गत सुरक्षेसाठी, मला काय करता येईल, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. मी काही अंदाज बांधते आहे, ते चुकीचेही असु शकतात पण ते चुकीचे असल्यास, सुधारणा हवी असल्यास तसे लिहा. ईमेल केले तरी चालेल. तुमच्याकडे काही नवीन विचार असतील, तर ते सजेस्ट करा किंवा स्वत:च्या ब्लॉगवर लिहा.

हल्ला झाल्यानंतरची सी. एस.टी. स्थानकाची काही छायाचित्रं मी पाहीली. तसेच, या स्थानकात पुन्हा गोळीबार झाल्यानंतर जी धावपळ उडाली होती, तीही मी पाहीली. मी मीडियाच्या लोकांना पाहीलं आणि अतिरेक्यांची वर्तमानपत्रामधून वा टी.व्ही. वर प्रसारीत झालेली छायाचित्रही पाहीली. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की हल्ला झाल्यानंतर लोक हातात असेल, नसेल ते सामान टाकून सैरावैरा पळ्त सुटतात, तेही साहजिकच आहे पण हाच हल्ला जर अफवा आहे हे कळलं, तर पुन्हा आपलं टाकून दिलेलं सामान घ्यायला धावतात. म्हणून आणीबाणीच्या परिस्थितीत, पळून जाउन, आपला जीव वाचवणं, एवढा एकच मार्ग शिल्लक राहिलेला असताना, हातचे सामान टाकून पळून जाण्यापेक्षा, स्वत:चा जीव आणि महत्त्वाच्या वस्तूही वाचवता येतील का, यावर मी विचार करत आहे.

ओव्हरनाईटर या प्रकारात मोडणारी ही बॅग, आपल्या सर्वांनाच परिचित आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांइतकीच, मिडीयाचे लोकही ही बॅग वापरणे पसंत करतात. अतिरेक्यांच्या छायाचित्रातही अशी बॅग तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. सर्वसाधारण कामाला जाणारे लोक ही बॅग वापरु लागले आहेत. वापरायला सुटसुटीत अशी ही बॅग आता सर्वांनीच वापरायला सुरूवात करावी असे मला वाटते. पुढे किंवा पाठीवर अडकवता येणारी ही बॅग वजनही छान कॅरी करते. रोज कामाला जाणारे लोक सर्वसाधारणपणे 5 किलोपेक्षा जास्त वजन नेत नसावेत, काही निवडक व्यवसाय याला अपवाद ठरू शकतात. नोकरदार स्त्रीवर्गाच्या एका खांद्यावर लटकवण्याच्या पर्सच्या तुलनेत तर अशी बॅग कितीतरी उपयुक्त ठरेल. पळताना हात मोकळे राहिल्यामुळे वेग वाढवता येतो व हल्लेखोराकडे तुमची पाठ असेल तर आत असलेल्या सामानामुळे कदाचित तुमचा जीवही वाचण्याची शक्यता असते. अर्थात आधीच सांगितल्यप्रमाणे ही एक शक्यता आहे. मी तज्ज्ञ नाही.

बसमध्ये बसल्यावर आपण बसलेल्या सीटच्या खाली, तर प्रत्येक जण वाकून पाहात असेलच पण बस सुरू झाल्यावर आणि स्टॉप येईपर्यंत वर्तमानपत्र व बसमधील टी.व्ही पाहताना आपल्या बाजूच्या, मागच्या व पुढच्या सीटवरील व्यक्ती काही सामान विसरून तर गेली नाही ना, हे नक्की पाहा. ट्रेनमध्येही अशी सावधगिरी बाळगता येऊ शकते. गर्दीमुळे जर फळीवरील सामान कोणाचे आहे, हे कळत नसेल, तर तसे नि:संकोचपणे विचारा. ज्याचे सामान आहे, त्यालाही राग येण्याचे कारण नाही; शेवटी हा प्रश्न सर्वांच्याच सुरक्षिततेचा आहे. स्वत:च्या गाडीने प्रवास करत असाल, तर गाडी रोज नीट चेक करा. चारचाकी वाहनांची खालची बाजू आरशातून पाहून चेक करता येऊ शकते. मला वाटतं, आपण सर्वांनीच अशी खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे.

पोलिसांच्या बॉम्ब स्क्वॉड मध्ये बॉम्बचा तपास करण्यासाठी काही प्रशिक्षित कुत्रेही असतात. आपल्या घरात पाळलेल्या श्वानाचा अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊन उपहोग करून घेता येईल का, याचा विचार केला पाहिजे. जेणेकरून रस्त्यात पडलेल्या अनोळखी वस्तूकडे आपले दुर्लक्ष झाल्यास निदान तो मुका प्राणी त्या वस्तूचे महत्त्व ओळखून आपल्याला सावध करेल. मला याची माहिती मिळवण्यासाठी पोलिस दलातील व्यक्तींना भेटायचे आहे. पोलिस दलातील कोणीही व्यक्ती हा लेख वाचत असल्यास कॄपया या गोष्टीचा विचार करून, योग्य ती माहिती सर्वांना मिळेल अशा माध्यमातून द्यावी.

तुम्हीही विचार करा. आपल्याकडे निरनिराळ्या कलेत, व्यवसायात 'बाय चॉईस' पारंगत असलेली लोकं आहेत, यांना आपल्या वैशिष्ट्यांचा खबरदारीसाठी अधिकॄतरित्या कसा वापर करता येईल याचा विचार करा. सकाळीच एका ब्लॉगवर वाचलं, एक पाकिस्तानी वेबसाईट, भारतीय संगणक तज्ज्ञांनी हॅक केली. विचार करा.

हे खबरदारीचं औषध आपल्याला निराळा फॉर्मुला वापरुन बनवायचे आहे. माहिती प्रसिद्ध करणं जर रास्त नसेल, तर त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींना भेटुन चर्चा करा पण हे औषध आपल्या देशासाठी बनवा.

3 प्रतिक्रीया - Comment

  1. Prabhas // Thursday, December 4, 2008 1:41:00 PM IST  

    ideach kharach chhan aahet, shivay implement karata yenya sarakhya aahet.

    http://my.opera.com/prabhas/blog

  2. Kanchan Chavan // Thursday, December 4, 2008 7:56:00 PM IST  

    Thanx Prabhas.

  3. Kanchan Chavan // Saturday, December 6, 2008 12:50:00 AM IST  

    माझ्या आणखी एक गोष्ट बरेच दिवस मनात होती, ती म्हणजे आपल्याकडच्या स्त्री पोलिस कोन्स्टेबलचा गणवेश अजूनही साडीच आहे, तसेच बॅ-याच नोकरीला जाणा-या स्त्रीयाही कामाला जाताना साडी नेसणे पसंत करतात, त्याऐवजी सलवार कमीझ हा पर्याय कसा वाटतो?